Sunday, July 7, 2019

मला भेटतो निसर्ग

-- मला भेटतो निसर्ग --

निसर्गाच्या कुशीमध्ये
माझं फुलतं शिवार
तोच कर्ता धर्ता आणि
तोच मायेची किनार

जाई, जुई, निशिगंध
चाफा, मोगरा सुगंधी
निसर्गाच्या सान्निध्यात
नित्य फुलण्याची संधी

दरी खोऱ्यातून येथे
पाट पाण्याचे वाहती
सुखावले चराचर
चिंब सरीत नाहती

खाली नटलेली धरा
वर अथांग आकाश
घेण्या मिठीत साऱ्यांना
पुढे येती बाहुपाश

मला भेटतो निसर्ग
येता जाता दारोदारी
भाजी भाकरी कष्टाची
वाटे लाखाची न्याहारी

🌿 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !