Monday, July 8, 2019

माझी लाडाची छकुली

--- माझी लाडाची छकुली ---

माझी लाडाची छकुली
पहा, झाली किती मोठी
मांडवात भरा तिची
खणा नारळाने ओटी

तुझी पाऊले इवली
आज जातील सोडून
जप माहेर सासर
दुवा नात्यांचा जोडून

सासऱ्याला म्हण बाबा
सासू होते मग आई
ऋणातच राहा त्यांच्या
नको होऊ उतराई

तुझा आणि जावयांचा
जोडा लक्ष्मी नारायण
नित्य नेमाने कर तू
सत्कर्मांचे पारायण

दीर तुझा मोठा भाऊ
ताई नणंद धाकली
त्यांच्या निखळ प्रेमाने
शान नात्यांची राखली

ध्यानी ठेव सदोदित
वाढो लौकिक घराचा
तूच दीप तूच वाती
आशिर्वच ईश्वराचा

@ सागरराजे निंबाळकर
      उल्हासनगर, ठाणे
       ८८७९८९७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !