Wednesday, July 10, 2019

मैत्री निसर्गाशी करू

-- मैत्री माझी निसर्गाशी --

खेळ खेळून तऱ्हेचे
मैत्री निसर्गाशी करू
झिम्मा फुगडी खेळता
हात त्याचा घट्ट धरू

तोच देतो खानपान
तोच हक्काचा आसरा
सूर्य वाटतो रागीट
चंद्र दिसतो हासरा

पहा झोकात कशा ह्या
जाई, जुई फुलतात
ज्वारी, गव्हाच्या लोंब्या ह्या
माळरानी झुलतात

उंच गगनाला भिडे
सारे विहंगम थवे
इंद्रधनू दाखवितो
रंग किती नवनवे

बारा मासात येतात
ऋतू तीन वेगळाले
बरसता चिंब सरी
ढग हळूच पळाले

गाते मंजूळ स्वरात
माझी गुणाची कोकिळा
वेड जीवाला लावतो
मोरपंख निळा निळा

मैत्री माझी निसर्गाशी
निभावतो मनोभावे
खाली धरा वर मेघ
त्यानं केलं माझ्या नावे

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !