Thursday, July 18, 2019

वाढदिवस मनोगत

     आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपणापैकी अनेकांनी व्हाट्सअप, फेसबुक, दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या. सगळ्या शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार !
'कविता तुमची आमची' समूह प्रशासक ह्यांनी त्यांच्या समूहात मला शुभेच्छा दिल्या आणि तिथल्या अनेक सदस्यांनीही दिल्या त्याबद्दल त्यांचेही आभार.

सर्वात पहिली लेखी शुभेच्छा मिळाली ती विक्रम पाटील ह्यांच्याकडून तर पहिली दूरध्वनी शुभेच्छा मिळाली अनिल सांगळे ह्यांची.

     सगळ्यात जास्त शुभेच्छा मिळाल्या साहित्यक्षेत्रातून. आनंदाची बाब आहे. पण एक चिंतन ही इथे करावं लागेल की, एका गोष्टीत नावलौकिक मिळवत असताना दुसऱ्या गोष्टींकडे कमी लक्ष दिलं जातंय का? आपली मित्रमंडळी, आपले आप्तगण आपल्याला विसरले की आपण त्यांच्यापासून दूर गेलो? समतोल राखण्यासाठी काय करावं?

     फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून शेकडो शुभेच्छा येत असताना दूरध्वनी वरून केवळ ३ शुभेच्छा याव्यात. यांत्रिकीकरणाचा किती हा दुष्परिणाम !
डिजीटायझेशन मुळे माणसं जवळ आल्याचा दावा आपण करतोय पण हा दावा खरा की खोटा चिंतन ज्याचं त्यानेच करणं योग्य आहे.
हे फक्त माझंच दुःख आहे असं नव्हे तर ही समस्या प्रत्येकाची आहे. एक विनंती ह्यानिमित्ताने करू इच्छितो की, किमान दोन मिनिटं का होईना एकमेकांशी बोलत चला. कारण वाचणं आणि ऐकणं फरक आहे. चिऊची काऊची गोष्ट वाचण्यात मजा आहे पण कोकिळेची तान ऐकण्यातच खरी मजा.
साहित्याच्या सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास फक्त कविता वाचून जेवढा आनंद होत नाही त्याहून जास्त सादरीकरण पाहून होतो. प्रल्हाद शिंदे, बाबूजी ह्यासारख्या अनेकांची गाणी आजही आपल्या ओठांवर आहेत. का? ती आपल्या कानावर पडली आणि आपसूक ओठी रुळून पाठ झाली.
नात्यात दरी पडण्या अगोदरच संभाषणाची इतकी झाडं लावा की त्याने नटलेल्या हिरवाईने मन प्रसन्न व्हावं. रोज काही क्षणासाठी का होईना तेथे बसायची इच्छा व्हावी.
    
     पूर्वी माझी अनेक मित्र मंडळी मला दूरध्वनीवरून, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायची परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात इतका मश्गुल झाला आहे की दोन मिनिटं फोनवर बोलण्या इतपत देखील त्यांच्याकडे वेळ नाही. हा यांत्रिकीकरणाचा परिणाम देखील आहे. आपलं प्राधान्य बदलणं ही देखील एक बाब आहे ह्यामागे. अर्थात याबद्दल काही राग नाही कारण ही वेळ माझ्यावर ही येऊ शकते पण सांगावसं वाटतं, वेळीच सावरूया !

तर एकंदरीत आजचा दिवस तसा साधासुधाच गेला. विशेष असं काही नव्हतं. फक्त आपल्याला कोणी शुभेच्छा दिली आणि काय लिहिलं आपल्याबद्दल हे वाचण्याची उत्सुकता हेच काय ते वेगळेपण !
काव्यात्मक, वर्णनात्मक, दोन वेगळे शब्द लिहून ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं विशेष कौतुक आणि आभार देखील !

कारण एखाद्याविषयी दोन शब्द लिहिण्यासाठी तो माणूस जाणून घ्यावा लागतो तेव्हाच त्याच्याबद्दल दोन शब्द मांडता येतात. आणि अनेकांनी मला जाणून घेतलं ह्याचा आनंद आहे.

     आयुष्यातलं एक वर्ष कमी झालं असं मी म्हणणार नाही. कारण एकूण किती वर्षे आयुष्य हे मला थोडेच ठाऊक आहे. ☺️
त्याजागी आणखी एका वर्षाने अनुभवी झालो असं म्हणेन.
२०१९ हे साल साहित्यिक कारकिर्दीत नक्कीच चांगलं गेलं आहे आत्तापर्यंत. आणि यापुढेही जाईल कारण आपल्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद नेहमीच पाठीशी आहे ह्यात दुमत नाही. काही काळ आजारपणात गेला परंतु त्यातही आपण सर्वांनी आपुलकीने केलेली विचारपूस आपली काळजी करणारे अनेक आहेत ही ग्वाही देऊन गेलं. आर्थिक अडचणी ही अनेक आल्या. त्यातही अनेकांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या ऋणात राहणेच योग्य.

     आपल्या सदस्या हर्षदा जोशी ह्यांनी आजवरचा साहित्य प्रवास, भविष्यातली उद्दिष्टे, संकल्प ह्याबाबत मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार थोडंसं :-

आजवरचा साहित्य प्रवास एका वाक्यात सांगायचा झाला तर २८ जुलै २०१९ रोजी प्रकाशित होणारी ३ पुस्तकं.
भविष्यात अनेक उद्दिष्टे आहेत. पैकी महत्वाचं म्हणजे प्रत्येक काव्यप्रकारात ५० रचना असणारं किमान एक पुस्तक आपल्या हातून लिहिलं जावं. साहित्यिकांसाठी जो मासिक काव्यवाचन कार्यक्रम सुरू केला आहे त्याचे किमान १०० कार्यक्रम व्हावेत. 'सूर अनोख्या मैफिलीचा' कार्यक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात मिळून ५०० प्रयोग व्हावेत. आणि इच्छा आहे की, साहित्य क्षेत्रात पहिला पुरस्कार स्वीकारताना आईने व्यासपीठावर येऊन आपल्याबद्दल दोन शब्द बोलावेत. ज्या व्यक्ती आपल्या पाठीशी ठाम उभ्या आहेत, एका हाकेवर धावून येतात त्यांनी अनेक बक्षिसं मिळवावी. ते निंबाळकरांसोबत असतात ऐवजी ते आणि निंबाळकर सोबत असतात असं वाक्य लोकांच्या ओठी असावं. (मित्रांचीही स्वतःची ओळख असावी)

संकल्प :- वेळेनुसार योग्य ते निर्णय घेणे, काही गोष्टींपासून अलिप्त राहणे, मातोश्रींच्या इच्छा पूर्ण करणे.

ज्येष्ठ कवयित्री ज्योती वैद्य शेटे ह्यांनी आज 'काव्यराजे' पदवी दिली. तिचाही आदरपूर्वक स्वीकार !

आपण सर्व असंच प्रेम करत राहा ह्या विनंतीसह थांबतो.
संवाद होतच राहतील !

आपलाच :- सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !