Monday, July 1, 2019

प्राशू मिलनाचा प्याला

-- प्राशू मिलनाचा प्याला --

बट सारून बाजूला
तुझं बळेच लाजणं
जसं कोऱ्या वाटेवर
लख्ख पडलं चांदणं

नाही नाही म्हणताना
नित्य प्रेमात राहावं
सांग सये मग तुला
कसं दुरून पाहावं

भेट पहिली वहिली
उभी राणी कोसो दूर
उतावीळ मना वाटे
स्वप्न झाले चक्काचूर

हळूहळू सरणारे
नव्या नवतीचे रंग
आपलंसं करण्याचा
मनी बांधला मी चंग

चुकूनच का होईना
स्पर्श एकदाचा झाला
जणू स्वर्ग जिंकल्याचा
लाभे दिलासा जीवाला

प्राशू मिलनाचा प्याला
आता जाऊ नको लांब
उमा माझी तू लाडकी
मीच तुझा भोळा सांब

😊 सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !