🤗 *बालपणीचं निरागस प्रेम* 🤗
_वाऱ्याची झुळूक यावी एखादी_
_तसंच, तुझं येणं असतं हल्ली_
_तरी ना खेद त्याचा कारण_
_वाऱ्याशिवाय का बहरते वृक्षवल्ली_
_विसरलोच कधी आठवण काढायला_
_तुझं ते हक्कानं दटावणं_
_मनधरणी करायची अन म्हणायचं_
_पुरे आता, बरं नाही सतावणं_
_आठवतंय मला आजही स्पष्ट_
_बालपणीचं ते निरागस प्रेम_
_शुभ्र झरा भावनांचा वाहता_
_आकंठ बुडूनही वाटणं जेमतेम_
_काळाच्या ओघात सुटले हात_
_आकस्मिक आपण दिशाहीन झालो_
_नजरानजर एके दिवशी आपसूक_
_पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात आलो_
_व्याख्या बदललेली नात्याची आता_
_जवळ असूनही एक अदृश्य अंतर_
_आरोप नसतो करायचा अशावेळी_
_काही कोडी सुटत जातात नंतर_
_दुरावा वाढल्याने प्रेम वाढतं पण_
_यंदा तसं काही झालं नाही_
_दरवेळी स्वच्छंदी कसं राहणार_
_असतात पंखांना ही सीमा काही_
_हरकत नाही, व्हायचं जे झालं_
_राहशील जिथेही आनंदात रहा_
_कधी पाय ओले कर किनाऱ्यावर_
_तर कधी सागरात मनसोक्त नहा_
🤗 *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !