Sunday, March 31, 2019

जीवनाचा रंगमंच (अष्टाक्षरी)

--- जीवनाचा रंगमंच ---

जीवनाचा रंगमंच
शिकवितो खूप काही
त्याने दिलेल्या ज्ञानाला
साऱ्या जगी तोड नाही

जन्मताच ज्ञात होतं
कोण आई कोण बाबा
तेच देऊ करतात
साऱ्या संस्कारांचा ताबा

मोठे होऊ जसजसे
ताण देते स्मरणिका
येते वाट्याला आपुल्या
रोज नवीन भूमिका

मोकळेपणानं कधी
अवघडल्यासारखं
कधी दुःखाच्या कुशीत
कधी सुखाला पारखं

घडवितो रंगमंच
नानाविध नटराज
शैली आगळी वेगळी
प्रत्येकाचा न्यारा बाज

खेळ असा प्रारब्धाचा
दाखवतो रंगमंच
शेवटाला साथ देतो
साऱ्या आठवांचा संच

*सागरराजे निंबाळकर*
   उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !