Tuesday, December 4, 2018

आई कविता

----- उपकार अनंत माऊलीचे -----

आठवतंय आजही मला आईचं
काट्याकुट्यातून अनवाणी चालणं
साऱ्या घरादाराच्या सुखापायी
वेदनांना पायाच्या भेगात सांधणं

तनाने बाहेर असायची फक्त
मन मात्र तिचं सदैव घराकडे
कोसो दूर ऐकायची, बाळाचं रडणं
जणू काही वाजलेत, सनई चौघडे

तगमग व्हायची जीवाची, वाटायचं
कधी एकदा बाळा जवळ घेते
ध्वनीलहरी द्यायच्या संदेश तिचा
नको रडूस, मी लवकरच येते

संसाराचं सुखही नव्हतं आईला
बापाचं दिनरात बाटलीत जिणं
मलाही वाटू लागलं मग कैकदा
अनुभवावं मायसारखं अश्रूंना पिणं

पडेल ते काम करायची, म्हणायची
बाळाला करेन मोठा जिल्हाधिकारी
आज मी उभा आहे सुटाबुटात पण
पाहायला माय माझी, येईना सामोरी

बसायचो काही क्षण, आहे तिथेच
धाय मोकलून मनसोक्त रडायचं
मला उभं करण्यात देह झिजविला
त्या माऊलीच्या पाया, कसं पडायचं

हसायचं थोडं, पुसत कडा पापण्यांच्या
जसा सागरी लाटांनी ओला होतो किनारा
उपकार अनंत, त्या थोर माऊलीचे
तीच अन्न, तीच वस्त्र, तीच माझा निवारा

@ *सागरराजे निंबाळकर*

(उपरोक्त कविता आमच्या माँसाहेबांना आणि तमाम मातृतुल्यांना समर्पित)

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !