Tuesday, February 19, 2019

माझा शिवबा (छक्कड)

माझा शिवबा (छक्कड)
चाल :- माझी मैना गावाकडं राहिली

माझा शिवबा, माझा शिवबा, माझा शिवबा

माझा शिवबा शूर सेनानी
त्याच्या किर्तीची गातो मी गाणी

बाहू ज्याची पोलादी अन, छातीत लखलखाट विजांचा
स्वराज्याचे पहिले धनी, प्रताप जिजाऊंच्या बीजांचा
कानात सुवर्णडुल मस्तकी, जिरेटोप शोभतो
लावूनी चंद्रकोर भाळी, हरहर महादेव बोलतो
तलवार खेळते वाऱ्याशी, डोळ्यांनी शत्रूचा खात्मा
हिंदवी स्वराज्य संस्थापक, गडकिल्ल्यांचा आत्मा

मुजरा माझा राजास
किल्ल्यांच्या श्रीमंतास
जयंतीला ह्या खास

गाऊ लागली शाहिराची वाणी
माझा शिवबा शूर सेनानी

शिक्षण सुरू युद्धनीतीचं, खेळावया दांडपट्टे
सोबतीला शिवबाच्या, मर्द मावळे मरहट्टे
भालेफेक झाली, तलवार झाली आता गनिमीकावा
ऐसा घडला शिवबा, स्वराज्याचा बेधडक छावा
समर्थ रामदास आणि लाभले तया दादोजी कोंडदेव
कैसे विसरावे शहाजींना, तुकोबांमुळे फुटला पेव

स्वराज्याची शपथ
चालुनी कैक पथ
विजयाचा हा रथ

किल्ले रायगड राजधानी
माझा शिवबा शूर सेनानी

पराक्रम ऐकू आता शिवबांचे काही थोडे
कैसे सोडविले अफजल्याचे भव्य कोडे
भेट ठरली पायथ्याशी, सोबतीला जिवा महाला
पाहताच राजास अफजल हसत हसत आला
मिठीच्या बहाण्याने केला त्याने दगाफटका
काढुनी कोथळा राजांनी केली स्वतःची सुटका

फाडला टराटरा
रक्ताच्या त्या धारा
बेभान वाही वारा

त्याच्या तोंडचं पळवलं पाणी
माझा शिवबा शूर सेनानी

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !