भारताचे गुण गाता, फुलते ही छाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती
शिवराय इथलेच, इथलीच राणी
गुरू गोविंद सांगती, कबिराची वाणी
नामा, जना, ज्ञाना झाले, इथे थोर संत
इथे जन्मल्याची नसे, कधी कुणा खंत
तुकोबांची गाथा सांगे, तू माझा सांगाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती
भीमराव लिहितात, न्यारे संविधान
देऊ सारे मनोभावे, कायद्यास मान
लतादीदी गाती जणू, कोकिळेचं गाणं
सतावतं ए पी जेंचं, अकालीच जाणं
मैत्रीत सांगावी कृष्णा, सुदाम्याची नाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती
कन्याकुमारी पासून, हिमालयी जाऊ
आरती नमाज सारे, एकसुरी गाऊ
होळी, बैसाखी, दिवाळी, गणपती येता
गोडी वाढते म्हणती, तिळगुळ देता
सुखाने नांदती येथे, विविधांगी जाती
डौले तिरंगा थाटात, साऱ्यांच्याच हाती
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !