Friday, January 11, 2019

संक्रांत येतेय

------- *संक्रांत येतेय* -----

यंदाच्या संक्रांतीला मलाही करावासा वाटतोय
हळदी कुंकवाचा कार्यक्रम..
मान सन्मानाचं गडद कुंकू तिच्या कपाळी लावून आणि
सुरक्षिततेच्या नावाची पिवळी हळद तिच्या भाळी लिहून !

वाण म्हणून देईन वचन तिला.
माझ्यासहित तमाम पुरुषांना आपल्या संस्कृतीचं महत्व सांगून भानावर राहण्याचं.

जमलंच तर खेळेन मंगळागौर ही....
ती खचत असताना तिला सावरणारी अन
परंपरेच्या उठाबशा काढत असताना भ्रामक कल्पनांना आवरणारी !

औपचारिकता म्हणून तीळ न देता,
एखाद्या प्रसंगाने तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आलं
तर, हसताना तिचे लाडवासारखे दिसणारे गाल पाहून म्हणेन आवर्जून मी ही

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.....!

बघा, जमलंच असं काही तुम्हालाही तर..

*संक्रांत येतेय.....!*

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !