--- *लिहून पाहीन मी सारं* ---
कविता यमकात होती म्हणून
वाटली असावी मिळतीजुळती
गझलेच्या शेरास वाह मिळाली
न पाहताच, जखम भळभळती
कविता लयीत नसेलही पण
ओततो मी भाव त्यात, सारे
वृत्तात लिहिताना हाती घेतले
मात्रा, लगावलीचे जळते निखारे
स्वरांचा काफिया करताना मी
चपखल यमकात कमी पडतो
वाटते मग कविताच भली अन
पुन्हा तिथेच, येऊन अडतो
काय हरकत आहे म्हणतो मी
सगळ्या प्रकारे लिहून पाहायला
कष्ट, जिद्द, उत्सुकता पुरेशी
रसिकांच्या काळजात राहायला
घ्या शपथ माझ्यासारखी तुम्हीही
एका प्रवाहात वाहण्यात मजा नाही
ठराविक ठप्पा लागून हयात गेली
ह्यासारखी दुसरी कोणती सजा नाही
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !