Sunday, May 19, 2019

माझे विनायक थोर (गीत)

-- *माझे विनायक थोर* --

छाती पहाडी जयाची
भाळी स्वातंत्र्याची कोर
साऱ्या स्वातंत्र्य वीरात
माझे विनायक थोर !! धृ !!

नाशकात झाला जन्म
किती न्यारी रोषणाई
आई बाबांचे संस्कार
दामोदर राधाबाई

लढा अन्यायाविरुद्ध
देई इवलेसे पोर !! १ !!

अष्टभुजा देवीपुढे
ज्यांनी घेतली शपथ
वय पंधरा अवघे
चाले शिवबाचा पथ

दीक्षा देऊनी शस्त्रांची
शत्रूंवर शिरजोर !! २ !!

काळ्या पाण्याच्या शिक्षेने
मन हेलावून गेले
तन, मन, धन सारे
दान देशापायी केले

काय वर्णावी महती
त्यांची कीर्ती काही और !! ३!!

भाषाशुद्धी लिपीशुद्धी
चळवळ मांडूनिया
साहित्यिक लेखणीने
जातीभेद कांडूनिया

हिंदूत्वाचा पुरस्कार
महासभेसाठी जोर !! ४ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !