पाहताच तिला साजशृंगारात
तडकून फुटल्या दर्पणाच्या काचा
लाख समजावत राहिली मला ती
मात्र माझी, मूक राहिली वाचा
परिस्थितीने हतबल होतो थोडा
बस, एवढाच काय तो माझा गुन्हा
छातीशी बिलगून दूर सारलं
आता प्रेम नाही होणे पुन्हा
नजरे समोरून दूर गेली क्षणात
जसं सरतं, अळवावरचं पाणी
दोष श्रीमंतांना कसा द्यावा हो
कालबाह्य ठरली आपुलीच नाणी
ठेच लागली, हरकत नाही
यापुढे जरा जपूनच चालू
विनवणी एकच मनाला माझिया
पुन्हा काही, गरळ नको घालू
जाशील जिथेही, खुश रहा सये
पुन्हा भेट व्हावी, अपेक्षा नाही
काहींना शिंपले गवसले 'सागरात'
काहींच्या हाती वाळूही टिकली नाही
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !