Sunday, May 5, 2019

आजही आठवतो गाव

------ *आठवतो गावचा पार* -----

_आजही आठवतो, गावचा पार मला_
_त्यावर बसून, होणाऱ्या मनसोक्त गप्पा_
_सदरे आता जरी असले, रेमंडचे माझे_
_त्याला जुन्याच, आठवणींचा कप्पा_

_नभाखालच्या शाळेत जाण्याची लगबग_
_सुरुवातीला गुरुजींनी घेतलेला परिपाठ_
_शिवरायांचा इतिहास, भारताचा भूगोल_
_मूल्यशिक्षणासवे सुसंस्कारांची न्यारी गाठ_

_मोठा होत गेलो, जसजसा मी_
_उच्च शिक्षणासाठी, सोडलेलं गाव_
_शहरात पैसे खोऱ्याने कमावले पण_
_भावनांचा कधीच ना, लागला निभाव_

_संगणक, मोबाईल, आलिशान चारचाकी_
_हीच माझी, जमवलेली आधुनिक नाती_
_इथे गालिचे, दिमतीला माझ्या सदैव_
_तिथे आसवं ढाळत राहिली, गावची माती_

_आज वार्धक्याच्या उंबरठ्यावर उभा मी_
_साथीला दोन वासे नी, केवळ भिंती चार_
_आवाज कसा देऊ, वटवृक्षाच्या पाराला_
_गाव सोडताना, मीच केलं ना त्याला हद्दपार_

------- *सागरराजे निंबाळकर* -------

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !