Sunday, May 26, 2019

शोकांतिका माझी

➖➖ *शोकांतिका माझी* ➖➖

रात्र सारी मधूशाळेत सरली.......
दिवसा तुझ्या डोळ्यांची नशा सये
थांबावं तर नेमकं कुठे थांबावं?
मन असं संभ्रमात, सारखं पडू नये

पाजायची जेवढी एकदाच पाज
उधारी अताशा, परवडत नाही
मैफिलीत गाताना गजल तुझ्यावर
शब्द घुमतात, अडखळत काही

साकीलाही कळतो हा घोळ सारा
उदार मनाने ती, रोज माफ करते
दुःख दिसताच डोळ्यात माझ्या
एक प्याला ती, जास्तच भरते

निघून जावंसं वाटतं दूर कुठेतरी
मैफिलीतही तीच नजर छळते
मद्यपी घोषित करून टाकलं पण
शोकांतिका माझी कुणाला कळते

आज जरी छेडत असलो सूर मी
उद्या असेनच, ह्याची काय खात्री
आलीच आठवण तर आठवा एकदा
काजव्याचं चमकणं, अंधाऱ्या रात्री

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !