Tuesday, October 23, 2018

अशाच एका चांदराती

🌙 _*अशाच एका धुंद चांदराती*_ 🌙

_अशाच एका धुंद चांदराती_
_मिलन मनामनांचं व्हावं_
_टपोर चांदणं पडावं अंगणी_
_दोघांनी मग एकसुरात गावं_

_मी तुझा, अन तू माझी सये_
_सांगण्या केवळ मौनाची परिभाषा_
_मधूचा चषक पडावा फिका_
_इतुकी तुझ्या डोळ्यात नशा_

_व्हायचं तेव्हा होशील माझी_
_मिळवणं तुला माझा पण नाही_
_येताच तू, पडावे सडे चांदण्यांचे_
_ह्यासारखा कोणताच सण नाही_

_पाहताच मला नजर चोरून_
_तुझं मुद्दाम बटांना सारणं_
_आवडू लागलंय आता मलाही_
_स्वतःच स्वतःला ठार मारणं_

_सवय जडली तुझीच आता_
_विरहात तुझ्या आठवांचा सहारा_
_वियोग होऊ नये अश्रूंचा म्हणून_
_पापण्यांचा आतल्या आत पहारा_

_अशीच यावी रोज कोजागिरी_
_काळजीच्या काजळीला दूर सारून_
_लिहिल्या जातील कविता एकेक_
_कधी चंद्रावर, कधी चांदणीला भाळून_

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !