आमच्या गावात एक विनोद नावाचे सद्गृहस्थ होते ज्यांना गावातली खडानखडा माहिती असायची. आणि गावातला कोणताही पत्ता विचारला तर ते अगदी बरोबर सांगायचे इतका बरोबर की माणूस ज्याच्या घरी जायचं आहे त्याच्या दिवाणखाण्यात देखील जाऊन पोहोचेल.
पण त्यांची पत्ता सांगण्याची शैली न्यारी होती. उजव्या बाजूला जा, डाव्या बाजूला जा असं आपण सांगतो ते त्याऐवजी उजव्या अंगाला, डाव्या अंगाला असं म्हणायचे.
एकदा गावात नवीन आलेल्या समीरने त्यांना सरपंचाचा पत्ता विचारला. विनोद रावांनी नेहमीच्या शैलीत त्यांना सांगितलं इथून सरळ गेलात की उजव्या अंगाला वळा. तिथून दोन मिनिटे चाललं की दोन चाळी लागतील. त्या दोन्ही चाळीच्या मधून बाहेर पडलात की पुन्हा उजव्या अंगाला वळा.
अशी अनेक अंग लक्षात ठेवताना समीर एक अंग चुकला. आणि जिथे उभं राहून पत्ता विचारला होता तिथेच येऊन पोहोचला.
त्याचा थकलेला चेहरा पाहून एका ग्रामस्थाने विचारलं,
"काय हो काय झालं?"
समीर उत्तरला, झालं काही नाही पण एक कळालं की,
*दरवेळी विनोदाच्या अंगाने जाऊन चालत नाही.*
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !