Saturday, June 29, 2019

जरतारी पैठणी (लावणी)

-- जरतारी पैठणी द्या मजला राया --

अडवू नका तुम्ही, जाईल हट्ट वाया
जरतारी पैठणी, द्या ना मजला राया !! धृ !!

यौवनाला खुणावितो, गोरा गोरा रंग
सोळा वरीस लोटले, चोळी झाली तंग
वेळीच घाला तुम्ही, आवर ह्या मनाला
नाहीतर कळेल, वार्ता साऱ्या जगाला

शहारलं अंगअंग, मोहरली काया !! १ !!

गोऱ्या गोऱ्या हनुवटी, काळा काळा तीळ
पिरतीचा सोडवू मी, सांगा कसा पीळ
पावसाचे थेंब गार, अंगाला झोंबती
उडणाऱ्या बटा जशा, पारंब्या लोंबती

तुमच्याविना जाईल, सारा जन्म वाया !! २ !!

शोभे तुमच्या नावाचं, गळ्यात डोरलं
नाव माझ्या ईश्वराचं, हाती मी कोरलं
गजरा मोगऱ्याचा मी, केसात माळते
दूर जाता जेव्हा तुम्ही, पत्रास चाळते

सुखांना नजर नको, टळो मोहमाया !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !