----- अकाली जाणं -----
रमत नाही मन अताशा माझं
ह्या बेगडी भौतिक सुखात
ना बापाचं ते खांद्यावर घेणं
ना आई भरवते घास मुखात
चाललीय पायपीट निरंतर परी
रस्ता कुठला ठावूक नाही
हस्तांदोलन करून हसतोय कधी
कधी छळतात क्षण भावूक काही
मित्र म्हणावं तरी कुणाला येथे
साऱ्यांच्याच हाती खंजीर टोचणारा
सारं निभावून नेलं आजवर पण
साहवेना दाह काळजाला बोचणारा
चंद्र, तारे आणून देतो म्हणालो
मात्र, येईपर्यंत थांबली नाही
वेल आमुच्या प्रेमरूपी वृक्षाची
माझ्या मनाजोगी लांबली नाही
वाऱ्यालाच मिठी मारतोय हल्ली नी
कोकिळेला सांगतोय गा एखादं गाणं
श्वास आहेत तोवर घेतो जगून
हाती असतं का आपुल्या अकाली जाणं
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !