Friday, June 28, 2019

ओठी माझ्या सदा तुझे नाव

----- ओठी माझ्या सदा तुझे नाव -----

ओठी माझ्या येते राणी, सदा तुझे नाव
विसरू कसे मी सांग, आठवांचे गाव !! धृ !!

पाहताच पहिल्यांदा, हरपले भान
शब्द शब्द वाटे तुझा, कोकिळेची तान
हळूच खुणावी मज, डोळ्यांची ही भाषा
पहिल्या प्रेमाच्या होती, पल्लवित आशा

कळेनाच घेते कसा, नजरेने ठाव !! १ !!

जाई, जुई, निशिगंध, गुलाबाची कळी
दूर सारे हळूहळू, दोघातली फळी
पहावे कितीदा तुला, चाफा माळताना
होत गेलो तुझा सारा, मला गाळताना

सुखावती मना सारे, मखमली घाव !! २ !!

प्रेम आपुले हे जणू, स्वर्गातल्या गाठी
जन्म घेतला लाखात, एकमेकांसाठी
भाळी तुझ्या शोभे कुंकू, सौभाग्याचं लेणं
साता जन्माचे सोबती, संसाराचं देणं

गाठेल किनारा आता, प्रपंचाची नाव !! ३ !!

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !