Thursday, August 17, 2023

बालपण यावे पुन्हा

~ बालपण यावे पुन्हा 

बालपण यावे पुन्हा, मागे परतून
फुलपाखरापरी जे, गेले निसटून ||धृ||

चिंता नव्हती कसली, नव्हते बंधन
धावायचे चोहीकडे, निरागस मन

होतो हळवा मी आता, सारे आठवून ||१||

खाऊसाठी रूपयाची, नोट मिळायची 
झाकली मुठीत तरी, मोठी वाटायची

गोष्टी सांगायची आई, घास भरवून ||२||

पावसात डोलायची, कागदाची नाव
विटीदांडू लगोरीचा, रंगायचा डाव

आता पाहतो केवळ, खिडकीमधून ||३||

आहे देवा तुझ्याकडे, एकच मागणे
यावे खेळायला माझ्या, दारात चांदणे

जगायचे आहे मला, लहान होऊन ||४||

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८७९८९७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !