Sunday, August 20, 2023

सोनं चांदी नको राया

~ सोनं-चांदी नको राया
(बैठकीची लावणी)

सोनं-चांदी नको राया, फक्त तुम्ही यावे
घडीभर का होईना, शेजारी बसावे ||धृ||

तुम्हाविना जगण्यात, नाही काही राम
तुम्हीच पंढरी माझी, तुम्ही चारीधाम

गूज मनातले माझ्या, तुम्हाला कळावे ||१||

नथ, राणीहार, ठुशी नकोशी वाटते
जेव्हा आरशासमोर, उभी मी राहते

फुल तरी सांगा राया, कसे मी माळावे ||२||

आठवते रात्रंदिन, शेवटची भेट
गेलात निघून तुम्ही, रागापायी थेट

पुरे की हो राया किती, काळीज जाळावे ||३||

अखेरचे श्वास माझे, मोजती घटका
किस्सा ऐकवा एखादा, हलका-फुलका

डोळे मिटता-मिटता, वैकुंठ दिसावे ||४||

@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८७९८९७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !