Saturday, November 6, 2021

घरचा आहेर

🤗 घरचा आहेर..

टीकेस लोकांच्या । हलक्यात घ्यावे
कृतीतून द्यावे । शालजोडे ।।१।।

बुद्धी भ्रष्ट ज्याची । त्याला नसे जाण
मान, अपमान । सारखाच ।।२।।

करावी लागते । तपस्या कठोर
चूक, बरोबर । ओळखून ।।३।।

पायरी स्वतःची । त्वरे ओळखावी
कल्पनेच्या गावी । रमू नये ।।४।।

जरी कळपाने । केला कुणी वार
मानावे आभार । दुर्जनांचे ।।५।।

हा म्हणे, तो म्हणे । ज्याचे त्याच्याकडे
सनई चौघडे । नको उगा ।।६।।

आत एक आणि । वेगळे बाहेर
घरचा आहेर । देऊ त्यांना ।।७।।

🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !