▪️कौतुकाचा धनी
अपुल्या वाटेने । चालूयात आता
नको येता-जाता । नमस्कार ।।१।।
करतील जे-ते । स्वतःची प्रगती
चालवून मती । हवी तशी ।।२।।
सल्ला देणे हल्ली । वाटे मज पाप
जणू शिव्याशाप । दिल्यापरी ।।३।।
केले ज्यांचे भले । जाण त्यांना नाही
भलतेच काही । मुखी आज ।।४।।
फिरून-फिरून । तहान लागली
विहीर खोदली । स्वार्थापोटी ।।५।।
जुळवतो आहे । प्रत्येकाशी आता
टेकवून माथा । खोटा-खोटा ।।६।।
होत नाही पूर्ण । एकही मनिषा
चुकतेय दिशा । कदाचित ।।७।।
उठता-बसता । घ्यावे गुळपाणी
गोड होते वाणी । दिसामाजी ।।८।।
शक्य आहे होणे । कौतुकाचा धनी
ठेऊ नये मनी । अढी फक्त ।।९।।
🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !