----- उगवली सुंदर पहाट -----
सडा सारवणाने
उगवली सुंदर पहाट
थंडगार लाट
हिवाळ्याची !! १ !!
अर्घ्य घालून
एकंच मागणं दिनकराला
साऱ्या घरादाराला
जपावे !! २ !!
तिखट ठेचा
साथीला गरम भाकरी
सर्जाराजाची चाकरी
नित्यनेमाने !! ३ !!
पाहतो विठूला
मी माझ्याच मळ्यात
अभंगवाणी गळ्यात
हरिपाठासवे !! ४ !!
दिवस मावळताना
वाट घरी परतीची
लाट भरतीची
सागराला !! ५ !!
शेतीमातीचं जगणं
सुखाचे दोन घास
चंदनाचा सुवास
घामाला !! ६ !!
अंगणात पडतं
लख्ख शुभ्र चांदणं
ताऱ्यांसवे जागणं
गप्पागोष्टीत !! ७ !!
अशीच राहो
माझ्या कुटुंबावर माया
कृपादृष्टीची छाया
भगवंता !! ८ !!
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !