Monday, November 19, 2018

अंधश्रद्धा निर्मूलन

----- डोईजड झाली अंधश्रद्धा -----

मंदिरात घंटारव पुजाऱ्यांचा
मस्जिदीत बांग देतसे मुल्ला
सांगा कोणास कळला देव
कोणी पाहिला प्रत्यक्ष अल्ला

कापून मुक्या जीवांना खुलेआम
का खेळतो आपण रक्ताची होळी
दिव्याच्या हट्टापायी जाळल्या पणत्या
रितीच राहिली मातृत्वाची झोळी

नावं बदलली काहींनी आपली
काहींच्या हातात गंडे दोरे
विश्वास ठेवून कर्मावर थोपट दंड
मानवा आता तरी शहाणा हो रे

काय कोडं मिरच्या, बाहुल्यांचं?
काय करतात नेमकं टाचण्या?
इस्पितळासारखी रांग लागते
फक्त नी फक्त चेहरा वाचण्या

मिटत चालल्यात हस्तरेखा साऱ्या
तरीही त्यातच नशीब शोधतो
राहू, केतू, मंगळाची करता शांती
साडेसातीने मात्र शनि कोपतो

कोण ऐकतं महिला समित्यांचं
कोणास ठाऊक निर्मूलनाची शाखा
विज्ञानावर डोईजड झाली अंधश्रद्धा
मित्रहो, वाकता येईल तितकं वाका

असावी श्रद्धा कर्मात आपापल्या
तेव्हाच समृध्दी म्हणेल शुभं भवतू
प्रवास सुरू राहिला अंधश्रद्धेसवे तर
गंतव्य स्थान आपुलं, केवळ मृत्यू

व्हावं निर्मूलन आता वेळीच मित्रहो
डोईजड व्हायला नको अंधश्रद्धा
आपण फक्त पाहत राहायचो अन
निघून जायचं हातचं, बघता बघता

@ *सागरराजे निंबाळकर*
        उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !