Sunday, November 18, 2018

व्योमगंगा गझल

वृत्त :- व्योमगंगा

गालगागा गालगागा गालगागा गालगागा

           ----- कित्येकवेळा -----

स्त्रीमनाच्या क्रंदनाला ऐकतो कित्येकवेळा
नाखुशीची गर्भहत्या पाहतो कित्येकवेळा

जिंदगी बरबाद केली समजते मज मद्यपाने
का तरीही तीच मदिरा चाखतो कित्येकवेळा

देव जागा राहतो अन पाहतो चुपचाप सारे
चोर राती दानपेटी फोडतो कित्येकवेळा

फास नाही घेतला दैना जरीही फार झाली
तीच शेती नांगरूनी राबतो कित्येकवेळा

देवतांचे प्रस्थ झाले सज्जनांचे अस्त झाले
दुर्जना लोटांगणे मी घालतो कित्येकवेळा

थोर त्या राजा शिवाजी संस्कृतीच्या रक्षकाला
आदरे मुजरा कराया वाकतो कित्येकवेळा

सांगताना दुःख अपुले आज मज "सागर" म्हणाला
माणसांची घाण मी स्वीकारतो कित्येकवेळा

@ *सागरराजे निंबाळकर*
        उल्हासनगर, ठाणे

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !