Tuesday, June 16, 2020

माहा लाडाचा ह्यो मेघ

-- माहा लाडाचा ह्यो मेघ --

मेघ पावसाळी आज
माह्या शेतामंदी आले
खेळ त्याहिचा रोजचा
काया मातीमंदी चाले

पहाटेच्या पारी मेघ
दिसे साजिरा गोजिरा
सांगे धरणी खुशीने
माहा लाखाचा ह्यो हिरा

येता जाता शेतामंदी
पानं, फुलंही भेटती
झिम्मा फुगडी खेयून
माह्या अंगाले खेटती

येता जाता रोज भेटे
गारगार थंड वारा
मंग स्पर्शाने येतसे
साऱ्या अंगाले शहारा

कधी हासतो खेयतो
कधी करी धुसपूस
तरी उजवतो रोज
काया आईची तो कूस

सदा राहो त्याची कृपा
माहा लाडाचा ह्यो मेघ
काया आईच्या भाळीची
दाट शोभिवंत रेघ

@ *सागरराजे निंबाळकर*

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !