Monday, November 28, 2022

जा तू सांभाळून

🌿 जा तू सांभाळून

चराचरामध्ये । ईश्वराचा वास
नको अट्टाहास । ठराविक ।।१।।

कलियुगामध्ये । आहे जो-तो व्यस्त
कुटुंब समस्त । एक नाही ।।२।।

संकटांमध्येच । देवा तुझे नाव
ओठांना सराव । नाही तुझा ।।३।।

मागती मागणे । देती जणू लाच
येईना उगाच । दारी कोणी ।।४।।

दिसतात खोटी । नाती पदोपदी
भावनेची नदी । आटलेली ।।५।।

भावा-भावामध्ये । नाही सुसंवाद
वादाने उच्छाद । मांडलेला ।।६।।

पार्थिव जायची । वाट पाहतात
त्वरे मांडतात । लेखाजोखा ।।७।।

प्रेम धनावर । असते अपार
भाव निर्विकार । गेले लया ।।८।।

शरीर राऊळी । मन घराकडे
असती वावडे । चिंतनाचे ।।९।।

देह मानवाचा । लाभतो एकदा
सार्थक सर्वदा । करू त्याचे ।।१०।।

जा तू सांभाळून । किनारी सागर
लाटांचा वावर । जिथे-तिथे ।।११।।

▪️सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !