-- भाग्य लागते मिळाया --
भाव मैत्रीतले सारे
मनी ठेवले जपून
नाही पडला तयांचा
मज विसर अजून
दिसामागे दिस जाता
मैत्री होत गेली घट्ट
कसा करू नये मग
रोज भेटण्याचा हट्ट
डोळे बोलके तुझे नि
एक खळी गालावर
सांग तूच आता मज
कसे यावे भानावर
नियमित संवादाने
कळू लागला स्वभाव
आपसूक येत गेले
माझ्या ओठी तुझे नाव
वाटा मोलाचा तुझाही
माझ्या हळव्या क्षणात
तूच निशा चांदण्यांची
तूच सोनेरी प्रभात
झाल्या काही कारणांनी
वाटा अपुल्या वेगळ्या
कुठे भेटगाठ मग
कुठे गप्पा त्या मोकळ्या
काळ लोटला बराच
पुन्हा आली तुझी साद
काय झाले, कसे झाले
नको आता काही वाद
भाग्य लागते मिळाया
अशी मैत्री जीवनात
बरसोत आता फक्त
सुखसरी अंगणात
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !