------- माझ्या महाराष्ट्रा....! -------
आज मितीला स्मरून हुतात्म्यांचे बलिदान
महाराष्ट्र देशा तुझे गातो मी गौरवगान !! १ !!
उभा थाटात सह्याद्री पश्चिमेला महाकाय
आहे लागून पूर्वेस भामरागडाचे पाय !! २ !!
साताऱ्याच्या कुशीतून कृष्णा कोयना वाहते
पंचगंगा मंदिर ती खुल्या डोळ्यांनी पाहते !! ३ !!
गोड-आंबट चवीला नागपूरातली संत्री
झाले चव्हाण पहिले यशवंत मुख्यमंत्री !! ४ !!
थंडीमध्ये पांघराया सोलापूरची चादर
साऱ्या जगात प्रसिद्ध पुणेकरांचा आदर !! ५ !!
कैक जीवांना पोसते मायानगरी मुंबई
तिच्या सौंदर्यासमोर फिके शांघाय, दुबई !! ६ !!
तुका, निवृत्ती, सोपान, ज्ञाना, नामा, जनाबाई
गाते ताटीचे अभंग पहा इवली मुक्ताई !! ७ !!
लता, विनोबा, सचिन झाले भारताचे रत्न
नाव उंचावण्या जगी कामी येती सदा यत्न !! ८ !!
कसे विसरावे कार्य वीर सावरकरांचे
योगदान हे अमूल्य साऱ्या महामानवांचे !! ९ !!
घरा-घरात शिवबा जन्मा घालते जिजाई
राहो महाराष्ट्रावर कृपा जगदंबा आई !! १० !!
@ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !