Friday, April 3, 2020

समग्र रामायण

------- समग्र रामायण -------

रामाची महती । साऱ्यांनाच ज्ञात
बोध जीवनात । मर्यादेचा !! १ !!

कैकयीच्या होत्या । दोन इच्छा खास
झाला वनवास । चौदा वर्षे !! २ !!

पुत्र भरतास । राजसिंहासन
निघाला लक्ष्मण । रामासवे !! ३ !!

ठेवूनी पादुका । राजगादीवर
केला कारभार । भरताने !! ४ !!

बदलून वेश । धावला रावण
सीतेचे हरण । करावया !! ५ !!

आश्वासले राम । हनुमानावर
सुग्रीव वानर । साथ देई !! ६ !!

नल नि निलाने । लिहिता श्रीराम
रामसेतू काम । झाले पूर्ण !! ७ !!

आले मदतीला । राजा बिभीषण
करण्या दहन । अहंकार !! ८ !!

अंजनीसुताने। केली खाक लंका
विजयाचा डंका । चोहीकडे !! ९ !!

हनुमानापरी । हनुमान फक्त
नाही दुजा भक्त । श्रीरामाचा !! १० !!

ऋषी वाल्मिकींनी । राहूनिया व्यग्र
लिहिले समग्र । रामायण !! ११ !!

@ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !