Wednesday, December 14, 2022

तुझ्या उशाला

▪️तुझ्या उशाला

इतक्यात घाबरू का मी या पराभवाला
आहे करायचे जर चितपट उभ्या जगाला

होतो तसाच आहे मी आजही मनाने
बदलून मात्र गेला श्रावण क्षणाक्षणाला

वृद्धाश्रमात शेवट झाला तिचा नि त्याचा
अस्वस्थ फार करते हे दृश्य काळजाला

होते शिवार हिरवे जे काल मेघराजा
झाले तुझ्या कृपेने ते आज झाडपाला

जगतोय रोज जो-तो अपुल्या मनाप्रमाणे
येईल का अशाने घरपण कधी घराला

करता कशास आता साहेब पंचनामा
गेलाय बाप माझा भेटायला ढगाला

जर तू सुखात आहे मोडून स्वप्न माझे
करतोय काय राणी "सागर" तुझ्या उशाला

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !