😊 काळीज मी कवीचे
शोकांतिका म्हणावी की दुःख पाचवीचे
सबबी नव्या-नव्या पण आरोप नेहमीचे
घेऊन रोज फिरतो झोळीत जो उन्हाळे
असणार काय त्याला अप्रूप सावलीचे
गळतीवरी कुणीही दिसला न भाळलेला
डोळ्यात स्वप्न जपती सारेच पालवीचे
मी झाड चंदनाचे देतो सुगंध कायम
का दान मग तरीही पदरात कत्तलीचे
गझलेमुळे जरी मी आहे समोर तुमच्या
अभ्यासले अगोदर काळीज मी कवीचे
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !