Sunday, December 11, 2022

पुढे जाते एक वाट

▪️पुढे जाते एक वाट

माझ्या शहरापासून
पुढे जाते एक वाट
जिथे वस्ती डोंगरांची
आणि सोनेरी पहाट

किलबिल पाखरांची
जणू मधुर भूपाळी
स्वतः येतात किरणे
दारी भेटाया सकाळी

सडासंमार्जन होता
घेते आकार रांगोळी
दिवा तेवतो देव्हारी
ओठी अभंगाच्या ओळी

चुलीवर भाकरीला
रोज गोंजारते आई
दोन घासात मिळते
लाखो जन्मांची पुण्याई

गोठ्यामध्ये गायी-म्हशी
त्यांच्या दिमतीला चारा
सर्जा-राजामुळे येते
पीक शेतीत दुबारा

स्वर्ग होते घरदार
नसे सुखाची उणीव
पाहुण्यालासुद्धा सारे
किती लावतात जीव

होते अंथरूण धरा
आणि नभाची चादर
काळ्या आईप्रती त्यांच्या
मनी सदैव आदर

दृश्य पाहून वाटते
आपणही इथे जावे
आता उरले-सुरले
करू गावाच्याच नावे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !