Tuesday, September 7, 2021

लेक लाडकी आमुची

🔰 लेक लाडकी आमुची..

आई-बापाला सोडून
आज सासरी निघाली
लेक लाडकी आमुची
लवकर मोठी झाली ।।धृ।।

घर वाटेल नवीन
त्याला आपलेसे कर
नको रडूस कधीही
आली आठवण जर

धीर लेकीला देताना
आई आसवात न्हाली ।।१।।

नको काळजी इथली
तिथे राहा आनंदाने
थोरा-मोठ्या घे जिंकून
आम्ही दिल्या संस्काराने

त्यांनी म्हंटले पाहिजे
आम्हा लक्ष्मीच मिळाली ।।२।।

कधी गौरी-गणपती
कधी दिवाळ सणाला
सवडीने का होईना
येत राहा माहेराला

भेट शक्य नसल्यास
फक्त, कळव खुशाली ।।३।।

तुझ्या भविष्याचे तूच
नीट लाव अनुमान
साथ आमुची मोजकी
आम्ही, पिकलेले पान

नको होऊ देऊ जीव
काळजीने वरखाली ।।४।।

◼️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८ ७९८९ ७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !