------- मज भार होत नाही -------
भेगाळल्या भुईचा मज भार होत नाही
शेती उजाडते पण मी ठार होत नाही
साधाच भांग होता अन पावडर जराशी
आई तसा अता मी तैयार होत नाही
निष्पाप लेकरांना हे दोन घास द्याया
थकतोय फक्त बाबा बेजार होत नाही
घालून गळ तिला मी अडवू अता कशाला
नात्यात भावनांचा व्यापार होत नाही
संवाद संपलेला अन बंद ही कवाडे
एका गुणामुळे या शेजार होत नाही
तजवीज या सुखांशी करणे अमान्य मजला
मी हार मानतो पण लाचार होत नाही
आधुनिकता जगाची, बघ दूर लोटणारी
चिठ्ठी हयात नसते अन तार होत नाही
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !