💫 *माता पिता सेवा* 💫
*पुंडलिका तुझा । वाटे मज हेवा*
*माता पिता सेवा । मनोभावे ।।१।।*
*सारी तीर्थक्षेत्रे । मातृचरणात*
*पिता सदनात । हृदयाच्या ।।२।।*
*गायली अंगाई । शांत निजवाया*
*जीवापाड माया । माझ्यावरी ।।३।।*
*ठेचाळता पाय । अश्रू घळाघळा*
*आर्त कळवळा । काळजीने ।।४।।*
*घेतलेत कष्ट । उपाशी राहूनी*
*अपेष्टा साहूनी । प्रेमापोटी ।।५।।*
*माता पिता माझे । विठू रखुमाई*
*शिवाची जिजाई । होती जैसी ।।६।।*
*फेडावया ऋण । जन्मही अपुरा*
*शब्दांचा हा तुरा । त्यांच्यासाठी ।।७।।*
*यशासाठी माझ्या । झटती सदैव*
*लढावया चेव । संकटांशी ।।८।।*
*देवा पांडुरंगा । सुखी त्यांना ठेवा*
*घडो नित्य सेवा । हातुनिया ।।९।।*
*कशाला फिरू मी । आता चारीधाम*
*मायपिता नाम । जिव्हेवर ।।१०।।*
*झालो आज लीन । त्यांच्या चरणाशी*
*सुखाचिया राशी । सदोदित ।।११।।*
💫 *सागरराजे निंबाळकर* 💫
उल्हासनगर, ठाणे
८८७९८९७७९७
खूपच छान
ReplyDelete