Saturday, June 11, 2022

रंग एकतेचा

🫱🏻‍🫲🏻 रंग एकतेचा..

भीक मतांची मागाया
नेते जाती दारोदारी
कधी आमिष नोटांचे
कधी गुत्त्याची सवारी

वीज, रस्ता, पाणी आणू
देती खोटी आश्वासने
निवडून आल्यावर
बंद होतात दालने

नाले साफ केल्याने का
शुद्ध होते अंतर्मन?
सेवा करू जनतेची
कोण पाळतो वचन 

एका माळेतले मणी
"बाण" असो वा "कमळ"
"पंजा" वैरी "घड्याळाचा"
नाही "इंजिनात" बळ

तंटा दिवसा नि रात्री
एका ताटात जेवती
बरळून काहीबाही
विष जातीत पेरती

दादा, भाऊ, आप्पा, नाना
कुणी बनतोय दूत
लाखो गुन्हे करूनही
यांची इज्जत शाबूत

लज्जा सोडून दिलेली
रोज बदलतो बाप
यांच्या कुळाला कायम
आहे विभक्तीचा शाप

योग्य जागा आता यांना
तूच दाव मतदारा
पीक नासके कधीच
नको पेरूस दुबारा

सुजलाम सुफलाम
होऊदेत सारा देश
रंग लावू एकतेचा
नको बदलता वेष

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
            मो - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, June 9, 2022

शर्यत आहे

~~~ शर्यत आहे ~~~

जीवन म्हणजे शर्यत आहे
जो-तो केवळ धावत आहे

गेले मागे गाव कधीचे
वारा मजला सांगत आहे

आई रखुमा, विठ्ठल बाबा
दोन्ही माझे दैवत आहे

लिहिला जावा शेर असाही
मैफल ज्याने गाजत आहे

हिंदू, मुस्लिम बांधव माझे
या, सगळ्यांचे स्वागत आहे

पणतीमध्ये दोन कुळांना 
उजळवण्याची ताकत आहे

शर्ती साऱ्या का गरिबांना ?
श्रीमंतांना सवलत आहे

हत्ती, घोडे, उंट शिपाई
"राजाची" ही दौलत आहे

मातीमध्ये शेवट होतो
अन् तू मजले चढवत आहे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
            मो - ८८ ७९८९ ७७९७

Wednesday, June 8, 2022

झाले गेले

गांधर्वी - गागागागा गागागा

झाले गेले विसरावे
आयुष्याला सांधावे

काटे झाले सवयीचे
फुल मी केव्हा तुडवावे

झोळी असता इवलीशी
जास्तीचे का मागावे

खेळी होती अपुल्यांची
दोषी कोणा मानावे

झाडांनाही मन असते
झडण्यापूर्वी बिलगावे

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
           मो - ८८ ७९८९ ७७९७

Sunday, June 5, 2022

वेदना आतली

कादंबरी - गालगागा गालगा

वेदना ही आतली
ऐनवेळी जागली

गंध थोडा घेतला
भूक सारी भागली

तू पराभव टाळला 
लाज माझी राखली

आज उरली का कुठे
नीतिमूल्ये चांगली

शिक्षणाची दुर्दशा
मान खाली वाकली

काय चुकले नेमके
का अशी तू वागली

एक वणवा पेटला
केवढी झळ लागली

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, June 3, 2022

मानत गेलो

अर्धक्षामा : गागागागा गाललगागा

अपुले सगळे मानत गेलो
का मी इतका वाहत गेलो

कोणी नसते संकटकाळी
अनुभवल्यावर सांगत गेलो 

सगळे काही नश्वर आहे
का मग इतके मागत गेलो

करण्याजोगे पुष्कळ होते
पण मी केवळ पाहत गेलो

करण्या कायम मुक्त फुलांना
काटे सारे वेचत गेलो

चुकला नाही सूर्य कुठेही
आपण झाडे तोडत गेलो

जागोजागी फक्त दिखावा
मोहाला मी टाळत गेलो

अपुला-परका भेद कशाला
माणुसकी मी पेरत गेलो

मृत्यूवरचा राग खरा पण..
जन्माशी मी भांडत गेलो

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
       मो - ८८ ७९८९ ७७९७

Thursday, May 26, 2022

स्वागत आहे

🫱🏻‍🫲🏻 स्वागत आहे..

करू नको तू माझ्यानंतर जवळ कुणाला 
तुझाच होतो तुझाच आहे सांग जगाला

कधी न झाली एकमताने चर्चा अमुची
शत्रूत्वाचा मात्र "सारखा" शाप मिळाला

जमेल तेव्हा यावे, जावे स्वागत आहे
नाही माझ्या तसे कुठेही दार घराला

कट्टरतेची व्याख्या म्हणजे "शंभूराजे"
झुकले नाही जरी लागले प्राण पणाला

कशी लिहावी गझल नेमकी शिकतो आहे
कधी ना कधी भिडेल माझा शेर मनाला

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
मो - ८८ ७९८९ ७७९७

Wednesday, May 25, 2022

आयुष्याची नाव

🌺 आयुष्याची नाव

पुन्हा एकदा मी | निरुत्तर झालो
फिरूनिया आलो | त्याच जागी ||१||

चुकतो का फेरा | जन्म-मरणाचा
आशा-अपेक्षांचा | खेळ सारा ||२||

कितीही मिळाले | समाधान नाही
राहतेच काही | खंत मनी ||३||

हवे तेवढेच | घ्यावे ताटातून
लोभ मागाहून | नको उगा ||४||

चोचले जिभेचे | असतात फार
मानू नये हार | तिजपुढे ||५||

घ्यावा एकाजागी | थोडासा विसावा
व्यर्थ आहे धावा | सुखामागे ||६||

किनारी लागेल | आयुष्याची नाव
ठेव योग्य भाव | अंतरात ||७||

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Saturday, May 14, 2022

खोपा

🌿 खोपा..

घडायचे ते घडून जाते
नसते काही हाती
करत रहा तू प्रवास पुढचा
जोडत नवीन नाती

अपुला-परका भेद कशाला
सारे कवेत घ्यावे
उरले-सुरले नकोच काही
ज्याचे त्याला द्यावे

सदा परीक्षा बघते नियती
सोंग नव्याने घेते
कुणी कफल्लक, कुणास अगदी
ओंजळ भरून देते

आहे त्यातच सुखी रहावे
नियम करावा सोपा
नको ईश्वरा महाल मोठा
दे छोटासा खोपा

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Friday, May 13, 2022

ओंजळ

🌺 ओंजळ..

कधी न कळले कशी अचानक
भुरळ मनाला पडते
ठरवतो एक करायचे पण..
दुसरे काही घडते

कसा सोडवू पेच असा मी
सर्व सावळा गोंधळ
तृप्त होणार इतक्यात पहा
पुन्हा रिकामी ओंजळ

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

Thursday, May 12, 2022

करावे चिंतन

🌿 करावे चिंतन..

कोणत्याही क्षणी । काहीही घडते
हातात नसते । वेळ कधी ।।१।।

"जर-तर" गोष्ट । शक्यतो टाळावी
जाऊ नये गावी । भाकितांच्या ।।२।।

कुवत अपुली । स्वतः ओळखावी
कल्पना निनावी । कशापायी? ।।३।।

अति चंचलता । संकटात नेते
पदोपदी देते । धडा मोठा ।।४।।

अर्धवट ज्ञान । उथळ स्वभाव
दावतो अभाव । स्थिरतेचा ।।५।।

दिसामाजी थोडे । करावे चिंतन
स्थिरावते मन । एकाजागी ।।६।।

आयुष्य म्हणजे । अथांग सागर
भरावी घागर । सत्कर्मांनी ।।७।।

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण