Saturday, June 11, 2022

रंग एकतेचा

🫱🏻‍🫲🏻 रंग एकतेचा..

भीक मतांची मागाया
नेते जाती दारोदारी
कधी आमिष नोटांचे
कधी गुत्त्याची सवारी

वीज, रस्ता, पाणी आणू
देती खोटी आश्वासने
निवडून आल्यावर
बंद होतात दालने

नाले साफ केल्याने का
शुद्ध होते अंतर्मन?
सेवा करू जनतेची
कोण पाळतो वचन 

एका माळेतले मणी
"बाण" असो वा "कमळ"
"पंजा" वैरी "घड्याळाचा"
नाही "इंजिनात" बळ

तंटा दिवसा नि रात्री
एका ताटात जेवती
बरळून काहीबाही
विष जातीत पेरती

दादा, भाऊ, आप्पा, नाना
कुणी बनतोय दूत
लाखो गुन्हे करूनही
यांची इज्जत शाबूत

लज्जा सोडून दिलेली
रोज बदलतो बाप
यांच्या कुळाला कायम
आहे विभक्तीचा शाप

योग्य जागा आता यांना
तूच दाव मतदारा
पीक नासके कधीच
नको पेरूस दुबारा

सुजलाम सुफलाम
होऊदेत सारा देश
रंग लावू एकतेचा
नको बदलता वेष

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
            मो - ८८ ७९८९ ७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !