🌿 करावे चिंतन..
कोणत्याही क्षणी । काहीही घडते
हातात नसते । वेळ कधी ।।१।।
"जर-तर" गोष्ट । शक्यतो टाळावी
जाऊ नये गावी । भाकितांच्या ।।२।।
कुवत अपुली । स्वतः ओळखावी
कल्पना निनावी । कशापायी? ।।३।।
अति चंचलता । संकटात नेते
पदोपदी देते । धडा मोठा ।।४।।
अर्धवट ज्ञान । उथळ स्वभाव
दावतो अभाव । स्थिरतेचा ।।५।।
दिसामाजी थोडे । करावे चिंतन
स्थिरावते मन । एकाजागी ।।६।।
आयुष्य म्हणजे । अथांग सागर
भरावी घागर । सत्कर्मांनी ।।७।।
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !