Tuesday, September 6, 2022

उशिरा कळले

~~ उशिरा कळले..

नव्हते माझे येथे काही उशिरा कळले
पर्वा नाही कोणालाही उशिरा कळले

धावत आहे जो-तो मागे आयुष्याच्या
उसंत नसते बसायलाही उशिरा कळले

फक्त मानले म्हणजे सारे अपुले नसते
"नाव" पाहिजे नात्यालाही उशिरा कळले

शल्य बोचते मनास जेव्हा उठता-बसता
कठीण जाते जगायलाही उशिरा कळले

सहजासहजी प्रकाश पडतो कधी कुठे का?
धैर्य लागते जळायलाही उशिरा कळले

■ सागरराजे निंबाळकर

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !