▪️कुणी नसतो कुणाचा
पाणी आटले डोळ्यात
चित्त नाही थाऱ्यावर
लाख कोठारे दुःखाची
सुख मात्र पसाभर
काय असते जीवन
कसे नेमके जगावे
इच्छा, आशा, स्वप्नपूर्ती
अशी कितीतरी नावे
एक गोळा करताना
जाते दुजे निसटून
प्रश्न पडतो मनाला
काय वेचावे यातून
कसा करावा संवाद
कशी जपावीत नाती
सगेसोयरेही जेव्हा
पाठ फिरवून जाती
घासातला एक घास
ज्याने ताटात वाढला
तोच खरा मित्र, बंधू
त्याला मानावा आपला
पळ काढतात कैक
संकटांच्या मालिकेत
बळ येते खूप जर..
कोणी घेतले कवेत
आला रिकाम्या हाताने
तुला जायचेही तसे
किती न्याहाळतो राजा
रोज फुटके आरसे
दानशूर तुरळक
ज्याला-त्याला प्यारी माया
होता आले तर व्हावे
एखाद्याची छत्रछाया
कुणी नसतो कुणाचा
सारे क्षणांचे सोबती
मागे उरते ती फक्त
केल्या कर्मांची पावती
↪️ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !