▪️जातीवंत कवी
ज्याला जसे हवे । तसे बोलू आता
सुखी येता-जाता । सारेजण ।।१।।
खऱ्याची दुनिया । निर्जन असते
कुणी न धजते । मुक्कामाला ।।२।।
तू मला खो द्यावा । मी तुला देईन
क्षणात नेईन । ढगांमध्ये ।।३।।
चुकीलाही जेव्हा । प्रसिद्धी मिळते
म्हणावे लागते । छान-छान ।।४।।
चुकीच्या दिशेला । पाऊले जातात
विश्वासाचा हात । सोडूनिया ।।५।।
अंधारात जेव्हा । ठेचाळतो पाय
सुचतो उपाय । आपोआप ।।६।।
नवखा असो वा । असो अनुभवी
मोजकेच कवी । जातीवंत ।।७।।
पसारा कशाला? । पुरे दोन ओळी
मोजावया खोली । आशयाची ।।८।।
शालजोडीमुळे । सोपे होते काम
मिळतो विराम । वादंगाला ।।९।।
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !