Monday, May 19, 2025

काटे उरात माझ्या

आजन्म पोसले मी काटे उरात माझ्या
वाटा कुण्या फुलांचा नव्हता सुखात माझ्या

दुष्काळ सावल्यांचा पाहून बारमाही
आले कधी न कोणी दारी उन्हात माझ्या

लावू कशास माळा चोहीकडे दिव्यांच्या
करते उजेड जर का पणती घरात माझ्या

वरवर तसा तुला मी कळणार फार नाही
जाणून पूर्ण घेण्या डोकाव आत माझ्या

डोळ्यांत आसवांचा येतो प्रलय कधीही
वाहून खूप काही जाते स्वरात माझ्या

पटले मनास जेव्हा मी पाहुणा क्षणांचा
उरली न कोणतीही इच्छा मनात माझ्या

~ सागरराजे निंबाळकर 

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !