Monday, May 19, 2025

मनाचा गाठताना तळ

मनाचा गाठताना तळ

मनाचा गाठताना तळ जराशी घे खबरदारी 
तिथे लागेल चकवा ये पुन्हा परतून माघारी

मला सुटले न कोडे हे कधीही आजतागायत 
थबकती पावले माझी अजूनी का तुझ्या दारी

पित्याने वाटणी केली खरेतर याचसाठी की.. 
खबर मिळताच गेल्याची मुले लढतील परभारी

मला तू शोधले केवळ घराच्या अंगणामध्ये 
दिवसभर मी उभा होतो तुला पाहत परसदारी

निजवतो नाइलाजाने उपाशी लेकरे माझी 
मला फळली न यंदाही विठूराया तुझी वारी

सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !