Wednesday, March 23, 2022

राख शेवटी हाती

➡️ राख शेवटी हाती..

कधी कुणाची, सुटेल सोबत
नेम जराही नाही
असले-नसले, सर्व सारखे
खेद न उरला काही

समीप आलो, म्हणता-म्हणता
अंतर वाढत जाते
असेल माझे, दुर्दैवाशी
युगायुगांचे नाते

हरलो, पडलो, सावरलोही
करून हिंमत गोळा
पाठ सोडते, दुःख कुठे पण
पडतोच पुन्हा डोळा

डोळ्यादेखत, विरते सगळे
राख शेवटी हाती
कसे कळावे, जाणारे मग
कुण्या दिशेला जाती

खेळ निराळे, नशिबाचे हे
डोक्यावरून सगळे
शरीरयष्टी, असते नश्वर 
जीवन अवघे ढगळे

बाजू अपुली, पुढच्यावेळी
पुन्हा एकदा मांडू
जगतो तोवर, आयुष्याशी
खोटेनाटे भांडू

🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !