Monday, September 14, 2020

बापाची कहाणी

-- बापाची कहाणी --

खिसा भरलेला असो
किंवा राहोत रिकामा
बाप देतो लेकरांना
सदा मायेचा मुलामा

राबूनिया दिसरात
येती तळहाती फोडे
लेकरांच्या सुखापायी
त्याने झिजवले जोडे

भाऊ, पती आणि बाप
निभावतो सारी नाती
भार संपूर्ण घराचा
तोलूनिया एकहाती

लेकरांच्या ताटामध्ये
कमी पडताच काही
त्याच्या घशातून घास
खाली उतरत नाही

भेट देतो लेकरांना
नव्याकोऱ्या कापडांची
स्वतः वापरतो जुने
जोड देतो ठिगळांची

आहेराच्या स्वरूपात
देतो आयुष्याची पुंजी
सुख लेकीचे घालते 
त्याच्या मनामध्ये रुंजी

वर फणसासारखा
आत नारळाचं पाणी
खरं सांगायचं तर
हीच बापाची कहाणी

➡️ सागरराजे निंबाळकर
मो - ८८७९८९७७९७

No comments:

Post a Comment

आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !