-- व्हावे लीन चरणात --
कधीकधी मनाजोगे
कधी विरुद्ध वागतो
थांग अपुल्या मनाचा
सांगा, कुणाला लागतो
आवडती येथ साऱ्या
फक्त कौतुकाचे बोल
बीज लटक्या शब्दांचे
किती रुजले सखोल
वाटे हरेका, चुकांचा
कोणी वाचू नये पाढा
जरी दडलेला त्यात
अर्थ बदलांचा गाढा
नको शिष्यत्व कुणाही
जो-तो मर्जीचा मालक
सृष्टी वेगळाली त्याची
तोच नित्याचा चालक
कर्म करत राहावे
चिंता नसावी फळाची
सदा जिंकती लव्हाळे
हार होते वादळाची
ओळखावे ज्याचे त्याने
हित नेमके कशात
गुरू करुनी एखादा
व्हावे लीन चरणात
➡️ सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
मो - ८८७९८९७७९७
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !